औरंगाबाद। वार्ताहर
'कोविड १९' चा संसर्ग झालेल्या रुग्णांचा तेराव्या दिवशीचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने करोनामुक्त झालेल्या सहा जणांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले, अशी माहिती घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. काल पाचजण करोनामुक्त होऊन घरी परतले, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पुन्हा सहा जण कोरोनामुक्त झाल्याने ३१ पैकी एकूण १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या मिनी घाटीत १३ करोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दोघाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एका कोरोनाबाधितावर घाटीत उपचार सुरू आहेत.
करोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी पाठविताना महापौर नंदकुमार घोडेले, मिनी घाटीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची विशेष उपस्थिती होती. आज ९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५६ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. घाटीतील प्रयोगशाळेत ४६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. तर काल आणि आजचे मिळून ४४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. प्रयोगशाळेतून एकूण ४८ स्वॅबचे नमुने येणे बाकी आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
Leave a comment