जालना । वार्ताहर
शहरातील दुःखी नगर भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका महिलेचा चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे दुःखी नगर मधील एका 65 वर्षीय महिलेने प्रकृती बरी नसल्याने प्रथम डॉ.महम्मद बदरोद्दीन यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर डॉ.सबनीस यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.या दोन्हीही खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्या नंतरही प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे सदर महिलेच्या शिक्षक मुलीने त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना सदर महिलेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. प्रयोग शाळेकडून सदर महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त दोन्ही खाजगी रुग्णालयातील कर्मचार्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या सर्व कर्मचार्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते. परंतु निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या व नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या निरामय हॉस्पिटल मधील कर्मचारी असलेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर बनल्याने जालना शहरात सर्वेक्षणाचे काम करणार्या कर्मचार्यांच्या पथकाने सदर महिलेला काल रविवारी जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सदर महिलेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. सदर महिलेचा अहवाल काय येतो याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.मात्र प्रयोग शाळेकडून प्राप्त अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे चिंतेचे ढग दूर झाले आहे
Leave a comment