कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता-गृहमंत्री अनिल देशमुख
जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकार्यांशी संवाद साधताना गृहमंत्री श्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.
गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले, देशासह राज्यावर कोरोना विषाणुची आपत्ती कोसळली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुमुळे केवळ एक महिला बाधित आहे. परंतू जिल्ह्यात या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासनाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गरजूंना स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातुन वेळेत पुरेसे धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबरोबरच ज्यांच्या रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनासुद्धा धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या पराज्यातील मजुर तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगली व्यवस्था केल्याने गृहमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मंत्री महोदयांना दिली.
Leave a comment