यंदाचे 315 वे वर्ष ; पालखी सोहळ्यातून व्यसनमुक्तीचा दिला जातोय संदेश
सोमवारी संत मुक्ताईंच्या पादुकांना शहागडला गोदापात्रात स्नान
सुशील देशमुख | बीड
आषाढी वारीसाठी प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीकडे प्रस्थान करत आहे. या पालखी सोहळ्याचे यंदाचे 315 वे वर्षे असून शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवणारा संत मुक्ताईंचा पालखी सोहळा महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायासाठी अभिमानास्पद आहे. श्री संत मुक्ताईंचा पालखी सोहळ्याचे येत्या 3 जुलै रोजी बीड शहरात आगमन होणार आहे. या दिवशी शहरातील माळीवेस येथील हनुमान मंदिरात संत मुक्ताईंच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर रात्री माळीवेस येथील हनुमान मंदिरात मुक्कामी थांबून दुसर्या दिवशी 4 जुलै रोजी मुक्कामासाठी पेठेतील बालाजी मंदिरात पोहचणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात असून या पालखी सोहळ्यात 3 हजार महिला-पुरुष वारकरी विठु नामाच्या जयघोषात पंढरीकडे प्रस्थान करत असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे व श्रीक्षेत्र मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र महाराज पाटील यांनी 'लोकप्रश्न'शी बोलताना दिली.
श्री संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी दिंड्या सहभागी होत असतात. यंदा या सोहळ्यात 100 हून अधिक छोट्या दिंड्यातून वारकरी सहभागी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पालखी सोहळा निघण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला त्यामुळे वारकरी शेतकरी पेरणी करुनच मोठ्या आनंदाने पंढरीकडे निघाले आहेत. श्री संत मुक्ताईंचा पालखी सोहळा आणि बीडकरांचे नाते अतिशय प्रेमाचे राहिलेले आहे. मुक्ताईंचा पालखी सोहळा शहरात येताच दरवर्षी पावसाचेही आगमन होत असते. या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा असून सजवलेल्या रथात संत मुक्ताईंची पालखी ठेवलेली असते. दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी भाविक मोठ्या उत्साहाने पालखी रथाजवळ नतमस्तक होतात.
श्री संत मुक्ताबाई संस्थान मुळ मंदिर मुक्ताईनगर येथून 18 जून रोजी पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. ठिकठिकाणचा पायी प्रवास करत 14 जुलै रोजी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा पंढरपुरमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान पालखी सोहळ्याचे एकुण 27 मुक्काम होणार आहेत. तर परतीच्या प्रवासा दरम्यान 21 ठिकाणी पालखीचे मुक्काम रहाणार आहेत. या पालखी सोहळ्यात महिला, पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदा परिसरातील छोट्या दिंड्यांनाही संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यात सहभागी करुन घेतले जाणार असल्याने पालखी सोहळ्यातील वारकर्यांची संख्या वाढणार आहे. दरम्यान पालखीतील वारकर्यांचे ठिकठिकाणी ग्रामस्थ मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. यंदा राज्य शासनाने वारकर्यांची अतिशय चांगली सेवा केली असल्याचे सांगत रविंद्र महाराज पाटील म्हणाले, यंदा पालखी सोहळ्या सोबत एक रुग्णवाहिका देण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांचे पथकही सोबत आहे. प्रशासनातील अधिकारी वारकर्यांच्या आरोग्याची विचारपूस करत असून काही आवश्यकता भासल्यास सहकार्य करत असल्याने राज्य शासनाचे आम्ही आभार मानत असल्याची प्रांजळ भावना रविंद्र महाराज पाटील यांनी व्यक्त केली.
पालखी सोहळ्यात बैलजोडीसह दोन अश्व
श्री संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासोबत 2 बैलजोडी व 2 अश्व असतात. यातील 2 बैलजोडी नाचनखेडा (मध्यप्रदेश) येथील राजेश पाटील हे पालखीसाठी देत असतात.यंदाही त्यांनी बैलजोडी संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. ही बैलजोड बीडपासून पुढे मांजरसुंब्याकडे जातांना संत मुक्ताईंचा रथ ओढते. यावेळी वारकरीही विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झालेले असतात.
सोमवारी गोदापात्रेत संत मुक्ताईंच्या पादुकांना स्नान
जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे आगमन होण्यापूर्वी शहागड येथे गोदावरी नदीपात्रात दरवर्षी संत मुक्ताईंच्या पादुकांना मंत्रोच्चारात स्नान घातले जाते. हा सोहळा पालखीतील वारकरी याचि देही याचि डोळा साठवतात. येत्या सोमवारी म्हणजेच 1 जुलै रोजी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा शहागडच्या पुलावरुन गेवराईकडे मार्गस्थ होतांना गोदापात्रेत संत मुक्ताईंच्या पादुकांना स्नान घातले जाणार आहे. त्यानंतर पादुका डोक्यावर घेवून त्या पुन्हा पालखी सोहळ्यात ठेवून ही पालखी पुढे गेवराईत मुक्कामी पोहचेल.
Leave a comment