नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर अद्यापही गाडी नाही
जिल्हावासीयांमध्ये नाराजीचा सूर
बीड । वार्ताहर
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर-कन्नड-चाळीसगाव या रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र या मार्गावर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगाव येथे पूर्वीपासून रेल्वेसेवा सुरु असताना नव्याने सर्वेक्षण करताना केवळ बीड जिल्हा समोर ठेवला गेला अन् दुसर्या मार्गाचे सर्वेेक्षण केले जात असल्याचे सांगितले गेले, पत्यक्षात मागील चाळीस वर्षांपासूनची मागणी असणार्या आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची नाडी समजल्या जाणार्या अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरील प्रत्यक्ष रेल्वेसेवा अद्यापही सुरू न झाल्याने जिल्हावासीयांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.धाराशिव-चाळीसगाव रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण उरकले पण बीडच्या स्थानकातून परळीच्या दिशेने अन् तेथून अहिल्यानगरला रेल्वे कधी धावणार? लोकप्रतिनिधी केवळ नव्या मार्गाचे श्रेय घेत राहणार का? असा प्रश्न जिल्हा वासियांतून विचारला जात आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी या मार्गासाठी मागील अनेक वर्षांपासून जनतेने संघर्ष केला. रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यावरच हा मार्ग साकार होऊ लागला. 4 फेब्रुवारी 2025 रोजी नगर ते बीडदरम्यान रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर रेल्वे चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. मात्र चाचणीला आता जवळपास पाच महिने उलटून गेले तरीही या मार्गावर एकही प्रवासी रेल्वे धावलेली नाही.
दरम्यान,बीड जिल्ह्यातील वडवणीच्या पुढेही रूळ अंथरण्याचे आणि स्थानक उभारणीचे काम पूर्णत्वास गेले आहे. तरीही रेल्वे सुरू न होणे ही बाब नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. रेल्वेचे डबे तयार आहेत, स्थानके उभी आहेत, तरीही प्रशासनाची गाडी सुरू का होत नाही, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.एकीकडे हा मार्ग अद्यापही प्रलंबित असताना, दुसरीकडे धाराशिव ते चाळीसगाव या नवीन रेल्वे मार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. भविष्यातील दृष्टीने हे सकारात्मक असले तरी, नागरिकांचे म्हणणे आहे की, एक वेळेस एक मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करावा म्हणजे त्या भागातील प्रवाशांच्या समस्या सुटतील आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल.परंतु लोकप्रतिनिधी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या मार्गाकडे दुर्लक्ष का करत आहेत, यावर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्याचा हा महत्त्वाचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून जनतेच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अरुण मेघराज यांनी बीड रेल्वे मार्गाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत काही बाबी रेल्वे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. बीड येथे तीन चार महिन्यापूर्वी बीड पर्यंत नवीन रेल्वेमार्ग तयार करून स्पीड टेस्ट घेण्यात आलेली असताना देखील अद्याप बीड येथून रेल्वे सुरू केली नसल्याने या बाबत दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना बीड येथून तत्काळ रेल्वे सुरुवात करण्यासाठी आदेश देण्यात यावेत आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
स्पीड टेस्ट होवून पाच महिने लोटले तरी रेल्वे धावेना
जितक्या घाईगडबडीत 4 फेब्रुवारी रोजी बीड स्थानकापर्यंत वेगाची चाचणी घेण्यात आली, सदर सीआरएस स्पीड टेस्ट घेऊन दोन महिने झाल्यावर देखील बीड पासून रेल्वे का चालविण्यात येत नाहीत? आजच्या तारखेत सध्यातरी बीडहून डिझेलवर धावणारी डेमो लोकल बीड ते अहिल्यानगर दरम्यान सहज चालविणे शक्य आहे, तरी लवकरात लवकर बीड-अहिल्यानगर दरम्यान दर रोज दोन वेळेस डेमू लोकल तर, रात्रीच्या वेळेवर बीड-मनमाड दरम्यान पास्ट पैसेंजर सुरू करण्यात यावी अशी सर्व जिल्हावासियांची मागणी आहे, मात्र याकडे ना रेल्वेच्या अधिकार्यांचे लक्ष आहे ना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे प्रत्यक्षात बीडहून रेल्वे कधी धावणार, येथील रेल्वे स्थानक उभारणीचे काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार. सर्व सुविधा कार्यान्वीत कधी होणार, हे सरळ, साधे प्रश्न नागरिकांना पडत आहेत, मात्र त्याचे उत्तर मिळत नाही.
वडवणीचे स्थानक बीडपेक्षाही मोठे
अहिल्यानगर-बीड-परळी वमार्गावरील रेल प्रशासनाचे काम पाहता बीड स्थानकापेक्षा वडवणी रेल्वे स्थानकाला जास्त महत्व देऊन बीड पेक्षा जास्त मोठा बनवण्यात येत आहेत. वडवणी स्थानकावरील शेड बीड पेक्षा तीन पट लांब निर्माण करण्यात येत आहेत. बीड पेक्षा जास्त संख्येवर सहा पटरी तयार करण्यात आले आहेत. वडवणीत जे काय निर्माण करण्यात येत आहेत स्वागतार्ह आहे, मात्र जिल्ह्या केंद्र असतांना बीड स्थानकाबाबत असा दुजाभाव कशासाठी केला जात आहे?
Leave a comment