संबंधितांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी
जालना । वार्ताहर
जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स कंपनीमध्ये काम करणार्या कामगारांपैकी एक 30 वर्षीय महिला ही गुजरात राज्यात गेली व तपासणीअंती कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती गुजरात पोलीसांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानुसार महसुल, आरोग्य, पोलीस व पंचायत विभागाच्या पथकाने गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स येथे जाऊन महिलेच्या 37 वर्षीय पती व त्यांच्या 15 निकट सहवासितांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव यांना कन्टेटमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना केल्या. तसेच महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, दोन पर्यवेक्षक व 12 आरोग्य कर्मचार्यांचा समावेश असलेले सहा पथके तयार करण्यात येऊन तेथे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. मुंबई येथुन आलेल्या राज्य राखीव दलाच्या 97 जवानांची वैद्यकीय तपासणी करुन 87 जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे अलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन उर्वरित 10 जवानांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दि.17 एप्रिल, 2020 रोजी 30 वर्षीय तरुणास खासगी रुग्णालयातुन जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. खबरदारी म्हणून तरुणाच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथील दु:खीनगर भागाती कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे. तसेच एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह तर 62 वर्षीय महिला गंभीर फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असुन दोघींचीही प्रकृती गंभीर आहे. या दोनही महिलांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 698 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 122 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 438, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-42 तर एकुण 283 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 27, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 142 एवढी आहे.
आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 31, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-98, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 03, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 122, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 251 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Leave a comment