जालना । वार्ताहर
जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान वितरित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून वेळ काढू धोरण अवलंबिले जात असल्याने आर्थिक टंचाईत सापडलेल्या ग्रंथालय चालक व कर्मचारी यांनी लॉकडाऊन तोडून निदर्शने करण्याचा ईशारा दिला आहे. या संदर्भात जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन मेल करण्यात आले आहे. सन 2019 -20 या आर्थिक वर्षातील ग्रंथालयांचे अनुदान जालना जिल्हा वगळता सर्वत्र ग्रंथालयांना मिळाले आहेत. मात्र जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कोषागार अधिकारी या दोन्ही कार्यालयांतील समन्वयाच्या अभावामुळे आर्थिक वर्ष संपून 18 दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप ही ग्रंथालयांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही.
आधीच कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ओढवलेल्या लॉकडाऊन च्या परिस्थितीत ग्रंथालय कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणा मूळे आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत ग्रंथालयांचे अनुदान जमा करण्याच्या सूचना द्याव्यात नसता लॉकडाऊन तोडून जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्याचा निर्णय ग्रंथालय संघाच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत, कार्यवाहक विजयकुमार पंडित, नानाभाऊ उगले, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तनपुरे, नानासाहेब शेरे, अरूण प्रधान, संगीताताई अंभोरे, प्रकाश रूपवते, भास्कर साळवे, गणेश भुतेकर, माऊली राजबिंडे, आण्णासाहेब खंदारे, लिंबाजी वाहुळकर, भाऊसाहेब नरवडे, सुनील कुलकर्णी, मधुकर गरड, आण्णासाहेब सोसे, देवीदास जिगे आदींनी ऑनलाईन बैठकीत चर्चा करून जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास लॉकडाऊन तोडून निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
Leave a comment