औरंगाबाद । वार्ताहर
प्रशासन गोंधळलेले आहे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अक्षरशः वेडेपणाचे निर्णय घेतले जात आहेत. सायंकाळी ७ ते पहाटे पाचपर्यंत पुन्हा शहरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. बहुदा मी रात्री सात नंतर आणि पहाटे पाचपर्यंतच येईन, असा करार कोरोनाने प्रशासनाशी केला आहे की काय ? असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला लगावला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या चुकीच्या निर्णयात लोकप्रतिनिधी देखील सहभागी होत असल्याची टिका देखील त्यांनी केली.
शहर व जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दररोज कोरोना रुग्णांचा आकडा दोनशेने वाढतो आहे. मृतांची संख्या देखील वाढत असल्याने प्रशासन प्रचंड हादरले आहेत यावर करण्यात येत असलेले सगळे उपाय फोल ठरत असल्याने, व पुन्हा कडक लॉकडाऊन करा, असा सूर लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्यांमधून निघाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाळूज औद्योगिक वसाहतीत संपुर्ण संचारबंदी, तर शहरी भागात सांयकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता पुन्हा लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पहायला मिळत आहे. खासदार इम्तियाज जलील वगळता इतर राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या निर्णयाला पांठिबा दर्शवला आहे. इम्तियाज जलील यांनी मात्र रात्रीच्या संचारबंदीची खिल्ली उडवत प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे वेडेपणा असल्याचे म्हटले आहे.
पुढे बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, कोरोना विषाणूंचा संसर्ग फक्त रात्रीच होतो, दिवसा त्याच्यापासून कुणाला धोका नाही असा प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा देखील समज झालेला दिसतो. जेव्हा जेव्हा प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींच्या बैठका झाल्या, तेव्हा कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय सूचवला गेला. बर दिवसा सूट आणि रात्री संचारबंदी याने काय साध्य होईल, याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे, ना आमच्या लोकप्रतिनिंधीकडे.
मी वारंवार बैठकीत अधिकारी आणि माझ्या लोकप्रतिनिधी सहकाऱ्यांना रात्रीच्या संचारबंदीचा हेतू काय? याची विचारणा केली. पण कुणीही उत्तर देऊ शकले नाही. कोरोना आणि प्रशासनामध्ये असा काही करार झाला आहे का ? की मी फक्त संध्याकाळी सात नंतरच येणार, दिवसा येणार नाही?
जिल्ह्यात 3126 कोरोनामुक्त, 2852 रुग्णांवर उपचार सुरू
घाटीत पाच, खासगीत दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 157 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 87, ग्रामीण भागातील 70 जणांचा समावेश आहे. आज एकूण 221 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 156, ग्रामीण भागातील 65 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 142 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6264 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 286 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2852 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. सायंकाळनंतर आढळलेल्या 21 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे.यामध्ये 17 पुरूष आणि 4 महिला रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (14)
गजानन नगर (1), गजानन कॉलनी (1), खोकडपुरा (1), विठ्ठल नगर, मुकुंदवाडी (1), हनुमान नगर (1), एन- दोन प्रकाश नगर (1), जाधववाडी (1), मुकुंद चौक (1), न्यू पोलिस कॉलनी, कोतवालपुरा (1), शरीफ कॉलनी, गल्ली नं. पाच (1), गौतम नगर (1), शिवाजी नगर (1), गारखेडा (1), जय भवानी नगर (1).
ग्रामीण भागातील रुग्ण (7)
सिडको महानगर (1), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (1), अल्फोन्सा शाळेजवळ, बजाज नगर (1), गुलजार मोहल्ला, खुल्ताबाद (1), आखातवाडा, पैठण (1), मुंडवाडी, कन्नड (1), वरुडकाजी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत पाच, खासगीत दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) 03 जुलै रोजी अरुणोदय कॉलनीतील 72 वर्षीय पुरुष, दोन जुलै रोजी लोटाकारंजा येथील 48 वर्षीय स्त्री, शेलूद चाठा येथील 65 वर्षीय पुरुष, अझिम कॉलनी, जुना बाजार 1 औरंगाबाद यैथील 65 वर्षीय स्त्री, आणि सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एका खासगी रुग्णालयात 2 जुलै रोजी पैठण येथील 73 वर्षीय महिला, 03 जुलै रोजी सिडकोतील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 222 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी 217 रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. त्यामुळे आतापर्यंत घाटीत जिल्ह्यातील 217, विविध खासगी रुग्णालयातील 68, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 01 अशा एकूण 286 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Leave a comment