औरंगाबाद । वार्ताहर
सरकारने 2016 साली चालनातून बाद केलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या एक कोटी रुपयांच्या नोटा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून जप्त केल्या आहेत. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. मुस्ताक पठाण (वय 53 रा. कटकटगेट, औरंगाबाद), हाशिम खान (वय 44 रा. मोंढा नाका) व दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, काही व्यक्ती सरकारने बाद केलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी शहरातील हॉटेल ग्लोबल, सिंधी कॉलनी औरंगाबाद येथे येणार आहे.
त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला असता चलनातून बाद 1 हजार रुपयांच्या 9610 नोटा व 500 रुपयांच्या 565 नोटा असे एकूण 98 लाख 92 हजार 500 रुपये आढळून आले. तसेच त्यांच्याकडील चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत आरोपींकडे या नोटा कोठून आणल्या व कोणास देणार होते, अशी माहिती विचारली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ दिली आहे. त्यांच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a comment