औरंगाबाद । वार्ताहर
साऊथ सिटी वाळूज येथील एकाच कुटुंबातील सहापैकी सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. 25 तारखेला कुटुंब प्रमुखाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे भरती करण्यात आले.
नंतर घरातील इतर पाचही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. ज्यात एक वर्षाचे बालक आणि 17 वर्षीय जन्मजात मानसिक व शारीरिक दिव्यांग असलेल्या मुलाचा सहभाग आहे. 27 जून रोजी रात्री 8 वाजता सदर मुलाच्या घरी आरोग्य पथक गेले असता दिव्यांग मुलाला चालता येत नसल्याचे आरोग्य पथकाला कळले. मुलाला बसमध्ये उचलून घेऊन जाण्यासाठी घरी एकही व्यक्ती नव्हती. कोरोनाबाधित मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे अत्यावश्यक होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी उपस्थित असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद डॉ. संग्राम बामणे यांनी स्वतःच पीपीई किट परिधान करून दिव्यांग मुलास बसमध्ये उचलून नेले. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
Leave a comment