पैठण । वार्ताहर
मे महिना संपत आला असताना तापमानाचा पारा 43 अंशावर गेला आहे. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी धरणाच्या बाष्पीभवनात झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पैठण तालुक्यातील जगप्रसिध्द जायकवाडी धरण मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडूनही धरण झपाट्याने शंभर टक्के भरण्याचा विक्रम झाला. त्यामुळे औरंगाबाद सह उर्वरित मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या नाथसागर धरणात 100टक्के पाणी साठा झाला होता.
आता मात्र पावसाळा सुरु होण्यास अवघे आठ दिवस बाकी असताना धरणाची पाणी पातळी 38 टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 38.52% झाली आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनाला पाणी पाळी सुरू आहे. कोरोना मुळे लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक वसाहत बंद असतानाही पाणी पातळी कमालीची कमी झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून त्यात आणखीन वाढ झाली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे.
Leave a comment