सोयगाव वनपरिक्षेत्राची दमदार कामगिरी
सोयगाव । वार्ताहर
सोयगाव वनपरिक्षेत्रातील मौजे गोंदेगाव शिवारात आईपासुन दुरावलेली राममांजराची तीन पिले सुखरूप आईच्या कुशीत विसावण्यास वनविभागाला यश आले आहे. वनविभागाने केवळ आठ तासातच ही मोहीम फक्त केली असून विभागाच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मौजे गोंदेगाव शिवारात 3 रानमांजराची पिले शेतकर्याला आढळून आली. सदर शेतकर्याने वनविभागाला कळवितात वनपरिक्षेत्र अधिकारी आर जी सपकाळ यांनी रेस्क्यू ऑपरेशनकरीता तात्काळ पथक रवाना केले. घटनास्थळी पोहोचल्यावर वनरक्षक गणेश गिरी व जी डी दांडगे यांना 3 रानमांजराची पिले आढळून आली. सदर पिलाची वैद्यकीय तपासणी करून ते रीयुनियन करण्यासाठी सक्षम असल्याबाबत खात्री करून घेण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद रेस्क्यू टीम चे सदस्य आदी गुडे यांच्या सहकार्याने केवळ आठ तासातच मोहीम यशस्वी झाली आणि आईपासून दुरावलेली रानमांजराची तीन पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली. रान मांजर हे *वन्यप्राणी अनुसूची क्रमांक दोन* मधील असून त्याचे शास्त्रीय नाव फेलिस चाऊस आहे. ती महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात आढळतात. ही मांजरे गवताळ जमीन, नदी ,नाले, ओे, दलदलीचा प्रदेश यातील झुडूप किंवा वेताच्या जाळ्यात राहतात. रानमांजर हे मासाहार गणातील मार्जार कुळातील वन्यप्राणी आहे. रानमांजराची मोकळ्या मैदानातील हालचाली एखाद्या छोट्याशा बिबट्यासारख्या असून त्यांच्यात विलक्षण चपळता दिसून येते. रानमांजर सकाळी किंवा संध्याकाळी शिकारीस बाहेर पडतात. उंदीर, सायाळ, पक्षी, लहान आकाराचे सस्तन प्राणी, कोंबड्या हे त्यांचे प्रामुख्याने खाद्य आहे. रानमांजरापासून मनुष्याला कोणताही धोका नसतो अशी माहिती यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर जी सपकाळ यांनी दिली.
Leave a comment