औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मद्यविक्री आजपासून दि.(1 जून) जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात येणार आहे. शहरात ऑनलाइन तर ग्रामीण भागात दुकानात मद्याची विक्री होणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे, शहरात कॅटेन्मेंट झोन वगळून ऑनलाइन मद्य विक्री करण्यास परवानगी आहे. तसेच मद्यविक्रीचे सर्व व्यवहार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. भारत सरकार गृहमंत्रालयाने घालून दिलेले नियम पाळणे सर्व ग्राहक व विक्रेता यांना बंधनकारक असतील. त्यामध्ये सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क वापरणे, कामगारांची थर्मल स्क्रिनिंग करणे, 50 टक्के मनुष्यबळाचा वापर करणे. त्याचबरोबर ग्रामीण भागात मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांनाही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच एका दुकानासमोर पाचपेक्षा अधिक ग्राहक असणार नाहीत, याची खबरदारी विक्रेत्यांनी घ्यायची आहे. दुकानासमोर 6 फुटावर वर्तुळे आखून घ्यावीत, सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क वापरणे ग्राहक व विक्रेता दोघांनाही बंधनकारक आहे. असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ग्राहक व विक्रेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात बजावले आहे.
Leave a comment