औरंगाबाद । वार्ताहर
जिल्ह्यात मद्यविक्रीला बंदी असताना अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना पोलिसांनी वाहन अडवून 85 हजार रुपयांची देशी दारू व 4 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 4 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार रोजी वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल दावत समोर एक टाटा कंपनीचे पिकअपमध्ये अवैधरित्या देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन वाहन थांबवले असता, त्यामध्ये देशी दारु भिंगरी संत्राचे एकुण 35 बॉक्स, अंदाजे 85904 रुपये किमतीची देशी दारू व 4 लाख रुपये किमतीचे टाटा पिकअप असा एकूण 4 लाख 85 हजार 904 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील वाहन चालकास ताब्यात घेतले असून आणखी एक जण पोलिसांना पाहून पळून गेला आहे. त्यांच्याविरुद्ध वाळुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment