परतुर । वार्ताहर
दुधना धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली असून सध्या मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. आतापर्यंत तरी प्रशासनाने कोणतीही बंधने न घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परतुर, मंठा व सेलू तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारे निम्न दुधना धरण प्रचंड पाणीउपसा होत असल्याने उपयुक्त पाणीसाठा संपून मृत साठ्यात गेले आहे, आज रोजी धरणाच्या मृत साठ्यातून पाणी उपसा केला जात आहे.मान्सून जरी उशाला आलेला दिसत असला तरी तो कसा व किती पडणार याचा अंदाज नसल्याने आहे तो पाणीसाठा जपून वापरला गेला पाहिजे हे महत्त्वाचे असताना धरणाच्या पाणी उपशा बाबत प्रशासन गाफील असल्याचे दिसते.मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती.
यावर्षीही तशीच स्थिती राहिली तर मोठे पाणीसंकट निर्माण होऊ शकते.त्यामुळे आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पण प्रशासन स्तरावर याबाबत कुठेच काळजी घेतली जात नसल्याने आश्चर्य वाटते. धरणाची मृत साठा पातळी 420.700 मीटर आहे, आज रोजी( 31 मे) धरणाची पाणी पातळी 419.700 मीटर आहे.त्यामुळे मृत साठ्यातून तब्बल 1 मीटर पाणी उपसा झालेला आहे. तर धरणाची जोत्याची पातळी 418.500 मीटर वर आहे, म्हणजेचं धरण जोत्याची पातळी गाठायला जवळपास एक मीटर बाकी आहे. तरीही प्रशासन स्तरावर कोणत्याही प्रकारची गंभीरता दिसत नाही.वॉटर ग्रीड वरील 148 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, परतुर, सेलू व मंठा पाणी पुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत, अशात पाणी उपसा असाच सुरू राहिला व आगष्ट पर्यंत धरणात पाणी आवक झाली नाही तर पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट उभे राहू शकते.आज धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी --09.16 असल्याने प्रशासनाने यासाठी योग्य पावले उचलण्यात यावी जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे मत जाणकार मांडत आहेत.
Leave a comment