तीन जणांना अटक, आरोपींविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल
पाचोड । वार्ताहर
घारेगाव ता.पैठण येथे गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतातील बांध नांगरण्यावरून झालेल्या हाणामारी प्रकरणात मृत्यू पावलेला तरूण शेतकरी कैलास उर्फ (काळु) मुरलीधर थोरे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तीन आरोपींना शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली असून आरोपींविरूध्द कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पार्वतीबाई मुरलीधर थोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कैलास उर्फ (काळु) मुरलीधर थोरे (वय 35) या शेतकर्याची पैठण तालुक्यातील घारेगाव शिवारात गट नंबर 80 मध्ये शेती असुन कैलास आणि त्याच्या भावकीतीलच असलेले अण्णासाहेब थोरे यांची शेती शेजारीच आहे. अण्णासाहेब थोरे आपल्या शेतीच्या बांधावर ट्रक्टरच्या सहाय्याने जमीनीचा बांध नांगरीत असतांना कैलास उर्फ (काळू) थोरेे व अण्णासाहेब थोेरे यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले.
अण्णासाहेब थोेरे व त्यांच्या दोन मुलांनी कैलास (काळू) थोरे याला जबर मारहाण केली होती.या मारहाणीत ते गंभीररित्या जखमी होवुन जागेवर कोसळला. गंभीर जखमी झालेल्या कैलासला तात्काळ पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत शेतकर्याची आई फिर्यादी पार्वतीबाई मुरलीधर थोरे यांनी पाचोड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी अण्णासाहेब थोरे, प्रल्हाद थोरे, भास्कर थोरे (सर्व रा.घारेगाव ता.पैठण) यांच्याविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा पाचोड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणी पाचोड ठाण्याचे फौजदार युवराज शिंदे, बीट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे यांनी काम पाहिले.
Leave a comment