24 हजार 85 वाहने जप्त करण्यात आली
औरंगाबाद । वार्ताहर
शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.लॉकडाऊन लागू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 67 हजार 784 रिकामटेकड्या वाहनधारकांवर कारवाई केली आहे. यामध्ये आजपर्यंत 2 कोटी 26 लाख 64 हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी वाहने घेऊन जाऊ नये, असे आवाहन केले होते मात्र याला औरंगाबादकरांनी गांभीर्याने घेतले नाही. शुक्रवारीही रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून आली. औरंगाबाद शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. शहरामध्ये मोठया प्रमाणात जागोजागी, चौका-चौकात, गल्ली बोळात नाकाबंदी, चेक पाईंट लावण्यात आलेली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळुन फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रस्त्यावर, वाहने वापरण्यास बंदी आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने लॉकडाऊन काळामध्ये आजपर्यंत 834 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी 8 गुन्हे दाखल करण्यात आले. तर आजपर्यंत शहरातील विविध विभागात पोलिसांनी रिकामटेकड्या वाहनधारकांवर कारवाई करत 24 हजार 85 वाहने जप्त केली आहेत. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली आहे.
Leave a comment