औरंगाबाद । वार्ताहर
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई असताना एक व्यक्ती पोलीस कॉन्स्टेबल असल्याची बतावणी करून बाहेर फिरताना आढळून आला. त्याची विचारपूस करून चिकलठाणा पोलिसांनी या तोतया पोलिसास अटक केली आहे. योगेश तुकाराम साठे (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकलठाणा पोलिसांची जालना मार्गावर शेंद्रा येथे पेट्रोलिंग चालू असताना योगेश साठे हा आर्मीची पॅन्ट, शूज घालून व मोटारसायकलला काठी बांधून जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्याची विचारपूस केली असता तो तोतया पोलीस निघाला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अजिनाथ शेकडे व रवींद्र साळवे यांनी केली आहे.
Leave a comment