परतूर । वार्ताहर
मुंबई येथुन मापेगाव येथे आलेल्या एका तरूणाला त्रास होवु लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, दरम्यान उपचार चालु असतानाच जालना येथील जिल्हा रूग्णालयात त्याचा मृत्यु झाला आहे. त्याला कोरोना आहे किंवा नाही यासाठी त्याचा स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान या रूग्णाचा मृत्यु झाल्याने मापेगावसह परतुर शहरातील नागरीकही चांगलेच धास्तावले आहेत. हा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्यास पुन्हा व्यवहार बंद होण्याची भिती नागरीकांमध्ये आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की 19 मे रोजी मुंबई येथून एक कुटुंब मापेगाव ता.परतुर येथे आले होते.त्या कुटूंबाला ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारनटाइन केले होते,10 दिवसानंतर 29 मे रोजी दुपारी यातील 45 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने आरोग्य विभागास कळवण्यात आले. परतुर आरोग्य विभागाच्या पथकाने त्या रुग्णास तातडीने जालना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रात्री उशिरा या रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.या रुग्णाचा स्वबचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. पण त्या आधी परतुर शहर व आजूबाजूच्या परिसरातील जनता चांगलीच धास्तावली आहे. कारण जर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर मापेगाव सह परतुर शहर जे मापेगाव पासून केवळ अर्ध्या किमी वरचं असल्याने धास्ती वाढलेली आहे. या आधी सुध्दा परतुर करांच्या कानजवळून गोळी गेलेली होती.एका पॉझिटिव्ह रुग्णांने परतुर शहरात आपल्या सासुरवाडीत मुक्काम केला होता पण सुदैवाने नातेवाईक निगेटीव्ह निघाले होते.सदर इसम आपल्या 5 जणांच्या कुटुंबातील सदस्यांसह रहात असल्याने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यास मोठा गुंता वाढत जाणार आहे.
जर या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर जालना जिल्ह्यातील हा पहिला कोरोना बळी ठरणार आहे, या मुळे सार्या जिल्ह्यातील जनतेचे याकडे लक्ष लागलेले आहे.
Leave a comment