शिवना । वार्ताहर
शिवना, ता. 29 (बातमीदार): उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांचे कोणतेही आदेश नसताना किंवा कोणत्याही ग्रामपंचायतीचा विनंती अर्ज नसताना, पाटबंधारे विभागाने दिलेल्या एका पत्रावरून वीज महावितरण कंपनीने अजिंठा- अंधारी मध्यम प्रकल्पालागतच्या रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. शुक्रवारी (ता. 29) पाटबंधारे विभाग व महावितरणने सुरु केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे धरणाच्या बुडित क्षेत्रातून अधिकृत पाणी उपसा करणार्या शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शिवना व अजिंठा येथिल शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गतवर्षी झालेल्या धुवाधार पावसात हा प्रकल्पओव्हरफ्लो झाला. प्रकल्पावर शिवण्यासह अजिंठा, मादणी, आमसरी व वाघेरा या पाचही गावांची तहान भागते. मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने आम्ही पाटबंधारे विभागाला वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात कुठलेहि पत्र दिले नाही अशी माहिती अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार, मदनीचे सरपंच संजय अपार व शिवण्याचे उपसरपंच अरुण काळे यांनी दिली. पाटबंधारे विभागाने ऐन पावसाळ्याच्या तोंडी आणलेल्या या ऊसण्या अवसानामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावर पूर्व हंगामी हिरवी मिरची व भाजीपाला लागवड केलेल्या शेतकर्यांवर मात्र कृत्रिम संकट ओढवले आहे. या प्रकरणात सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे.
शेतकर्यांनी आत्महत्या करावी काय: दुर्गाबाई पवार सरपंच अजिंठा
मिरची सह भाजीपाल्याची शेकडो हेक्टर लागवड केलेल्या शेतकर्यांनी आत्महत्या करावी काय असा थेट सवाल अजिंठ्याच्या सरपंच दुर्गाबाई पवार यांनी केला आहे तर शेतकर्यांच्या हितासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने अधिकृत पाणी उपसा करणार्या शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये असा निर्णय घेतल्याची माहिती शिवन्याचे उपसरपंच अरुण काळे यांनी दिली.
Leave a comment