शिवसेनेच्या वतीने सिल्लोड मतदार संघातील राबविलेल्या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील सद्यस्थिती, शिवसेनेच्या माध्यमातून गरजूंसाठी राबविण्यात आलेले उपक्रम तसेच खरीप हंगामातील पूर्व तयारी बाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रात्री राज्यातील शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांशी संवाद साधला. यावेळी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद तसेच पालकमंत्री म्हणून धुळे जिल्ह्यातील सद्य स्थितीचा आढावा देत परिस्थितीवर सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी ना. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या वतीने मतदार संघात राबविलेल्या उपक्रमांची माहिती देताच मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सदरील उपक्रम अविरतपणे सुरू ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ना. अब्दुल सत्तार यांना केले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांकडून लॉकडाऊनचे पालन होत असून पोलिस व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे ना. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले तर खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्या मुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील कर्जमाफी योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ देणे, शासकीय कापूस व भरड धान्य केंद्रातील काही अटी शिथिल करून शासकीय दरातील कापूस, मका, ज्वारी ,बाजरी खरेदी गतिमान करणे गरजेचे असल्याचे ना.अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
लॉकडाऊन काळात हातावर पोट भरणारे कामगार यांना धीर देण्यासाठी सिल्लोड - सोयगाव मतदार संघात शिवसेनेच्या वतीने आतापर्यंत जवळपास 50 हजार गरजूंना मोफत अन्नधान्य व किराणा किट घरपोच देण्यात आले असून गरजूंना घरपोच जेवण, रस्त्याने पायी जाणार्या स्थलांतरित कामगारांना जेवण, यासह गरजूंना दूध, भाजीपाला , शिवसेनेच्या वतीने घरपोच देण्यात आले असल्याची माहिती ना. अब्दुल सत्तार यांनी या कॉन्फरन्स मध्ये दिली. तसेच सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक कुटुंबांना मास्क, साबण मोफत देण्यात आले तर शहरात विविध ठिकाणी सेनेटायझर फवारणी मशीन बसविण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषद, आरोग्य विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघातील नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली असून मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीना शिवसेनेच्या वतीने मोफत सेनेटायझर देण्यात आले असल्याची माहिती ना. अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. लॉकडाऊन काळात सिल्लोड मतदार संघात शिवसेनेच्या वतीने सामान्यांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कौतुक केले. पहिल्या लॉकडाऊन पासून शिवसेनेच्या माध्यमातून ना. सत्तार यांनी मतदार संघातील गरजूंना मदतीचा ओघ कायम ठेवला हे कार्य अभिनंदनीय असून ना. अब्दुल सत्तार यांनी सदरील उपक्रम कायम ठेवावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ना.अब्दुल सत्तार यांना यावेळी केले.
Leave a comment