सिल्लोड । वार्ताहर
शासनाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विस्थापित मजूर, आर्थिक दुर्बल घटक, रेशनकार्ड नसलेले किंवा रेशनकार्ड ऑनलाईन न झालेले अशा सर्व गरजू नागरिकांना प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने सर्वे करण्याचे काम सुरू झाले असून या योजनेपासून एकही गरजू लाभार्थी सुटता कामा नये अशा सूचना महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी संबंधित प्रशासनास दिल्या आहेत.
कोरोना संकटात शासनाच्या वतीने करण्यात येणार्या उपाययोजना संबंधी पालकमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या बैठकीत ना. अब्दुल सत्तार यांनी रेशनकार्ड (शिधापत्रिका) नसणार्या मात्र गरजू कुटुंबाना ही शासनाने मोफत अन्न धान्य देण्याचा मुद्दा मांडला होता. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी संमती दिली होती. त्याअनुषंगाने शासनाने रेशनकार्ड (शिधा पत्रिका) धारक नसलेल्या गरजू कुटुंबाना मे आणि जून या दोन महिन्यासाठी अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या संकटात राज्यातील गोरगरीब व गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. लॉकडाऊन च्या संकट काळात कोणीही उपाशी झोपणार नाही यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे म्हणून सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील प्रत्येक गावात रेशनकार्ड नसलेले , विस्थापित मजूर, आर्थिक दुर्बल घटकांतील एकही गरजू नागरिक आत्मनिर्भर या योजनेतून सुटता कामा नये अशा सूचना ना.अब्दुल सत्तार यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
Leave a comment