औरंगाबाद । वार्ताहर
पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना दिल्या.
मॉन्सून पूर्व करावयाची सर्व कामे, घ्यावयाची खबरदारी, आवश्यक साधनसामुग्री, बचाव साहित्याबाबत सविस्तर आढावा श्री. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजोय चौधरी आदींसह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. ऑनलाइन माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
आपत्ती व्यवस्थापनात बचाव साहित्य व शोध साहित्य याचाही आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावर आवश्यक असणार्या साधनसामुग्रीची तत्काळ मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे करावी, अशा सूचनाही श्री. चौधरी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील रस्ते, पूल यांची तपासणी करून तसा अहवाल सादर करण्यात यावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असणार्या पथक प्रमुखांची नियुक्ती करावी. ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषदेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. महावितरण कंपनीने दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत. महानगरपालिकेनेही स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा. रस्त्यावरील उघडे मॅनहोल तत्काळ बुजविण्याचे कामही करावे. शहरातील धोकादायक इमारतींना तत्काळ नोटीस बजावण्यात याव्यात. बीएसएनल कंपनीने त्यांचे चेंबर्सही बुजवावेत. अशाप्रकारे मॉन्सून पूर्व करावयाच्या तयारीचा सविस्तर आढावा श्री. चौधरी यांनी घेतला. यावेळी त्यांनी गंगापूर, वैजापूर आणि पैठण येथील बोटीची सद्यस्थिती आणि करावयाची कार्यवाही याबाबतही निर्देश दिले. तालुकास्तरावरील रस्त्यांची स्थिबती तपासून पाण्याखाली जाणार्या रस्त्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तालुकास्तरावर मॉन्सून पूर्व तयारी बैठक घेण्यात यावी. जलतरणपटू, मदतीसाठी धावून येणारे स्वयंसेवक आदींची मुख्य संपर्क यादी तयार ठेवावी. दैनंदिन पर्जन्यमान योग्य आणि वेळेत घेण्यात यावे, अशा सूचनाही श्री. चौधरी यांनी उपस्थित संबंधित अधिकारी यांना केल्या.
Leave a comment