केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मानले आभार
जालना । वार्ताहर
रेशनकार्ड नसलेल्या स्थलांतरित मजूरांना कोरोनाच्या संकटकाळात मोफत धान्य देण्यासाठी आपल्या खात्याने मांडलेल्या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देऊन आठ कोटी लोकांना दिलासा दिल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी सांगितले.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, संपूर्ण देशात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते त्या स्थलांतरित मजुरांना धान्य उपलब्ध करण्यास राज्य सरकार असमर्थ होते. कोरोनाच्या परिस्थितीत विविध राज्यांशी चर्चा करताना आपल्याला ही समस्या जाणवली. त्यानुसार आमच्या खात्याने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला व मंजुरीसाठी विनंती केली. त्यांनी ताबडतोब या प्रस्तावानुसार देशासाठी 8 लाख मेट्रिक टन तसेच महाराष्ट्रासाठी जवळ पास 70, 000 मेट्रिक टन अन्नधान्य मंजूर केले. याचा देशातील 8 कोटी लोकांना फायदा होणार असून या योजनेचे राज्यातील लाभार्थ्यांची संख्या सुमारे 70 लाख आहे. सुमारे 8 कोटी स्थलांतरितांना दर महिन्याला प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे दोन महिन्यांसाठी (मे आणि जून) मोफत धान्य केंद्राच्या कोट्यातून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. यासाठी अन्नधान्य सबसिडी देण्यात येणार आहे. याखेरीज आंतर राज्य वाहतूक आणि हाताळणी यावर होणारा खर्च, वितरकाचा लाभ यासाठी येणारा खर्चही पूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे. त्यानुसार भारत सरकारकडून एकूण खर्च अंदाजे 3500 कोटी रुपये आहे. वेगवेगळ्या राज्यांना धान्य किती प्रमाणात द्यावे, हे केंद्र सरकारने ठरवले असून धान्य वाटपाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे, अशी माहिती मा. रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.
Leave a comment