पालकमंत्री राजेश टोपे यांची राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या बैठकीत मागणी
मुंबई । वार्ताहर
जालना जिल्ह्यातील कापूस खरेदीला गती देण्यासाठी सीसीआयने खरेदी केंद्र वाढवावेत. दररोज 75 ते 100 गाड्या कापसाची खरेदी व्हावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज या बैठकीत केली. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनील देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. यावेळी कापूस खरेदीला वेग देण्याची गरज असून सीसीआयने खरेदी केंद्र वाढविण्यासंदर्भात खासदार शरद पवार यांना भेटून त्यात लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी कर्ज वाटप जास्त होण्याची गरज आहे. एकूण उद्दिष्टाच्या 50 टक्के कर्ज वाटप होते. त्यासाठी राष्ट्रीयीकृत व मध्यवर्ती सहकारी बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याची मागणीही पालकमंत्री टोपे यांनी केली. खते, बियाण्याची मुबलक उपलब्धता असून कमी पडल्यास शेतकर्यांनी स्वतःकडील बियाणे वापरावे, असे आवाहनही टोपे यांनी केले. प्रारंभी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सविस्तर सादरीकरण केले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनीही सादरीकरण केले.
Leave a comment