औरंगाबाद । वार्ताहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज सकाळी सहा वाजता बायजीपुरा परिसरातील इंदिरा नगरातील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच टाऊन हॉल येथील जयभीम नगरातील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा 19 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन मृत्यूंसह घाटीत आजपर्यंत 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
घाटी 35, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. इंदिरा नगरातील रुग्णास नुमोनिया व ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने व्हेंटिलेटरवर अतिदक्षता कक्षात ठेवले होते. मात्र, उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 15 वर्षांपासून उच्च रक्तदाब आजाराने ते त्रस्त होते. जयभीम नगरातील रुग्णाचा घेतलेला लाळेच्या नमुन्याचा अहवाल (19 मे रोजी) मृत्यूपश्चात कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांचे शव शवागृहात ठेवले होते. त्यांना मधुमेह आजार सहा वर्षांपासून होता, उपचारादरम्यान त्यांनाही व्हेंटिलेटरवर ठेवले होते, असेही त्यांनी सांगितले.
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment