जिल्हा प्रशासनाचा रोखठोक इशारा
जालना । वार्ताहर
जालना शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाहेर जिह्यासह अन्य राज्यातून येणार्या लोकांचे लोंढे दिवसेंदिवस वाढतच चालले असून या येणार्या लोकांची माहिती दडवून ठेवली जात असल्याची माहिती प्रशासनाकडे प्राप्त होत आहे. यापुढे जालना शहरात किंवा जिल्ह्यातील कोणत्याही गावात बाहेरची व्यक्ती आल्यानंतर सदर माहिती प्रशासनाला कळविली नाही तर सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह नागरी भागात प्रभाग समितीला जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 41 रुग्ण आढळून आले असून यातील दोन ते तीन रुग्ण वगळले तर उर्वरीत सर्व रुग्ण हे जिल्ह्याच्या बाहेरून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, जिल्हा शल्य चिकित्सक त्यांचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा सेविका,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक , पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आदी सर्वच कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असून या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाला जालना शहर व जिल्ह्यातील जनतेतून सर्वोतोपरी सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत झाली आहे. मात्र दुसरीकडे बाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जालना शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येणार्या लोकांचे लोंढे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परिणामी कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात आहे. ऑनलाइन परवानगी व्यतिरिक्त येणार्या लोकांचा यात मोठया प्रमाणावर समावेश असून शहर आणि अनेक गावांत देखील बाहेरून येणार्या व्यक्ती बाबत विशेष काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरी भागात प्रभाग समिती सदस्य आणि ग्रामीण भागात सरपंच व पोलीस पाटील यांनी दक्ष राहून बाहेरून येणार्या लोकांची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. बाहेरून येणार्या लोकांची माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करून याबाबतीत गांभीर्याने लक्ष न दिल्यास सरपंच, पोलीस पाटील आणि नागरी भागात प्रभाग समिती सदस्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
Leave a comment