औरंगाबाद । वार्ताहर
राज्य राखीव बलातील 93 जवान कोरोनाच्या बंदोबस्तावरुन 6 मे रोजी सायंकाळी शहरात पोहोचले होते. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होते. त्याचा अहवाल प्राप्त होताच महाराष्ट्रातील पोलिस दलाला मोठा धक्का बसला होता. 93 जवानांपैकी 74 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून या जवानांना सातारा परिसरातील श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते.
त्यानंतर मंगळवारी दुपारी समाधानकारक माहिती प्रसिध्दी माध्यमांना देण्यात आली. 74 जवानांपैकी 67 जवानांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.राज्य राखीव बलाच्या एका तुकडीला 23 मार्च रोजी मालेगावात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चार अधिकारी व जवान असा 97 जणांचा समावेश होता. 45 दिवसांची मुदत संपल्याने अधिकारी व कर्मचा-यांना माघारी बोलावण्यात आले होते. तत्पुर्वी त्यांची मालेगावात आरोग्य तपासणी करण्यात आली होती. अधिकारी व जवानांना त्रास नसल्याने परवानगी घेऊन त्यांना औरंगाबादकडे बोलावण्यात आले होते. 6 मे रोजी शहरात दाखल झालेल्या तुकडीतील कर्मचा-यांची शस्त्रे व वाहने सॅनिटाईज करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना श्रेयस इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. यादरम्यान, महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यातील 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
वसतीगृहातच झाले उपचार
राज्य राखीव बलाच्या जवानांवर श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात उपचार सुरू होते. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या डॉ. निता पाडळकर, सातारा परिसरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुणे, डॉ. सुहास वाव्हळे, औषध निर्माता राजेंद्र बो-हाडे, सुनील सुर्यवंशी व मुकेश कासाट यांनी उपचार केले. या जवानांच्या उपचारासाठी सहायक समादेशक आय. एस. शेख, निरीक्षक एल. एस. सपकाळ, आर. ए. राऊत व उपनिरीक्षक व्ही. के. राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a comment