जालना । वार्ताहर
कोरोना प्रादुर्भावाचा च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीव्यवस्था आणि शेतकरी उध्वस्त होऊ नये यासाठी राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँक यांच्या माध्यमातून शेतकर्यांना तात्काळ कर्जपुरवठा करण्याची मागणी माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहेे.
मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हाभरात कर्ज वाटपाबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या, त्या बैठकांच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर, लीड बँकेचे चेअरमन - मॅनेजर, कृषी व विभाग, महसूल विभाग इत्यादी च्या माध्यमातून लक्षांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले.परंतु या वर्षी मात्र बँक कर्ज वाटप बाबत टाळाटाळ करत आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी,उपविभागीयअधिकारी ,तहसीलदार यांनी बैठक घेऊन बँकांना ताकीद देणे आवश्यक आहे तसेच मुजोरी करणार्या बँकेवर कारवाई करून त्या बँकेचा परवाना रद्द करण्याबाबतची शिफारस जिल्हाधिकारी यांनी रीझर्व बँकेकडे करणे आवश्यक आहे.कर्ज वाटपाच्या बाबतीत मागील काही वर्षात जालना राज्यात सातव्या तर मराठवाड्यात दुस-या क्रमांकावर होता. या वर्षी मात्र कर्ज वाटपाचा लक्षांक मागील काही वर्षांपेक्षा कमी असताना देखील बँकांच्या मुजोरीमुळे लक्षांक पूर्ण होईल असे वाटत नाही. कर्ज पुरवठा झाला नाही तर शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल. एक तर संपूर्ण तालुकाभरात सीसीआय कापूस खरेदी केंद्र एक असते, त्यात 30 ते 40 लोकांचा कापूस दररोज घेतला जातो परंतु नोंदणी मात्र तीन हजार ते पाच हजार शेतक-यांनी केलेली आहे.त्यामुळे पेरणीपूर्वी कापूस विकला गेला नाही तर शेतक-याला सावकाराच्या दारात जाण्याची गरज पडू शकते, परीणामी शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय सहकार मंत्री यांनी वेळीच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी , तसेच तहसीलदार आणि सर्व बँकेचे मॅनेजर यांना वेळीच आदेशीत करून शेतक-यांना कर्ज वाटप करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना द्याव्यात,व याबाबत निवेदनाची प्रत माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस विरोधीपक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी, जालना यांना ही दिले आहे.
Leave a comment