जिल्ह्यात एकावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी
जालना । वार्ताहर
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 17 मे, 2020 च्या मध्यरात्रीपासुन ते 31 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आदेश जारी केला आहे.
तसेच जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग अधिनियम आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये जिल्ह्यात वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या अनुषंगाने काढण्यात आलेले सर्व आदेश, सुधारित आदेश ज्यांना दि. 17 मे, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती ते सर्व आदेश, सुधारित आदेश दि. 31 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहतील. तसेच लॉकडाऊन शिथिल, उठवण्याबाबत राज्य शासनाकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यास तसे आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील. या आदेशाचे पालन न करणार्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Leave a comment