जिनिंग प्रेसिंगच्या प्रोपायटर, व्यवस्थापकांसोबत बैठक
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांचा कापूस पूर्णक्षमतेने मे अखेरपर्यंत खरेदी करण्याच्या राज्य कापूस पणन महासंघ, भारतीय कापूस निगम लि. (सीसीआय) आणि जिनिंग प्रेसिंगच्या प्रोपायटर आणि व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिनिंग आणि प्रेसिंग मालकांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. चौधरी होते. यावेळी ते होते. बैठकीस जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, कापूस पणन महासंघाचे विभागीय अधिकारी श्री. ठिगळे, सीसीआयचे प्रतिनिधी श्री. उमंग आदींसह जिनिंग, प्रेसिंगचे मालक यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील अंदाजे चार लाख क्विंटल कापूस खरेदी होणे आवश्यक आहे. स्थानिक मजुरांकडून जिनिंग प्रेसिंगचे प्रोप्रायटर, व्यवस्थापकांनी काम करून घ्यावे. कन्नड तालुक्यातील विठ्ठलपूर येथील शाखांबरी ग्रो इंडस्ट्रीज दोन दिवसात सुरू करावी, सीसीआयने उद्यापासून कापूस खरेदी करावी. पाचोड येथील कालिका, दत्तात्रय जिनिंग चालू करावी, अन्यथा जिनिंग अधिगृहित करण्यात येईल. सीसीआयने या केंद्रांवर तत्काळ खरेदी सुरू करावी. भारतीय कपास निगम, महाराष्ट्र राज्य कापूस महासंघाच्या ग्रेडरने कापूस शेतकर्यांचा असल्याबाबत खात्री करावी. यासाठी स्थानिक पातळीवर चौकशी करावी. सीसीआयने वैजापूर येथील वाघलगाव येथील एस.एस. ग्रो इंडस्ट्रीज आणि गंगापूर येथील किसान कोटेक्स जिनिंग प्रेसिंग येथे कापूस खरेदी चालू करावे. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी या जिनिंगला भेट देऊन त्यांची संमतीबाबत चर्चा करावी. त्यानुसार सीसीआयने निविदाबाबतची प्रक्रिया तीन दिवसात पूर्ण करावी. कापूस महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांनी सिल्लोड येथे दोन जिनिंगवर खरेदी केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करावी. याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी तत्काळ भेट देऊन अहवाल सादर करावा. तसेच महावितरणने जिनिंग प्रेसिंगची वीज जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश बैठकीत श्री. चौधरी यांनी दिले. यावेळी जिनिंग प्रेसिंगच्या प्रोपायटर, व्यवस्थापकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. तसेच पणन महासंघ, सीसीआय यांनीही जिल्ह्यातील कापसाबाबतची स्थिती जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांना अवगत करून दिली. तसेच सीसीआयची कापूस खरेदीची मुदत सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले.
Leave a comment