मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 लाखाची मदत
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे.औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला 51 लाख रुपयांची मदत केली आहे. मागील आठवड्यात संचालकांच्या ऑनलाइन बैठकीत राज्यमंत्री तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक ना.अब्दुल सत्तार यांनी याबाबत मुद्धा मांडत मदत देण्याबाबत सुचविले होते त्यानुसार याबाबत निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यापूर्वी ही मागील महिण्यात बँकेने 11 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले होते.
बँकेने केलेली ही मदत कोरोनाशी लढताना गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वापरली जाणार आहे. गुरुवार (दि.14) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना 51 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील, व्हाईस चेअरमन दामूअण्णा नवपुते, कार्यकारी संचालक राजेंद्र संचालक, सर व्यवस्थापक अजय मोटे, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे यांची उपस्थिती होती.
सहकार क्षेत्रानेही मदतीसाठी पुढे यावे-ना.अब्दुल सत्तार
राज्यातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रानेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले .
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment