जालना । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून आलेल्या एकूण 18 रुग्णांपैकी आजपर्यंत 7 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरित सर्व अकरा रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. जिल्हा रुग्णालयातील जिगरबाज डॉक्टर आणि कर्मचार्यांकडून करण्यात येत असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असून ही जालना वासीयांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकून अठरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असली तरी शिरोडा ता.परतूर आणि इंडेवाडी ता.जालना या दोन स्थानिक महिला रुग्ण वगळता उर्वरित सोळा रुग्णांना परजिल्हा किंवा परराज्यातील प्रवासाची पार्श्वभूमीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा हा खर्या अर्थाने सुरक्षित जिल्हा असल्याचे कोरोना रुग्णांच्या आकडेवारी वरून समोर आले आहे.एकूण अठरा रुग्णांपैकी शिरोडा ता.परतूर येथील एक महिलेला कोरोनामुक्त झाल्यामुळे यापूर्वीच सुट्टी देण्यात आली आहे.तसेच राज्य राखीव दलातील कोरोना बाधित जवान पूर्णपणे बरे होऊन त्यांचे सलग दोन अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर या जवानांना देखील काल गुरुवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.महत्वाचं म्हणजे जालना जिल्ह्यात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या जालना शहरातील दुःखीनगर मधील 65 वर्षीय महिलेने जिल्हा रुग्णालयात कोरोनाशी लढा देत अखेर जिल्हा रुग्णालयातील लढवय्ये डॉक्टर, आणि जिगरबाज आरोग्य कर्मचारी, परिचरिकांच्या मदतीने मात करून कोरोनाला पराभूत केले. न्यूमोनियासह इतर आजार जडलेले असतांनाच कोरोनामुळे बाधित झाल्याने आपण यातून बरे होणार की नाही या चिंतेमुळे ग्रासून गेलेल्या या महिलेची हिम्मत चांगलीच खचली होती.मात्र,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यासह परिचारिकांनी केलेले शर्थीचे प्रयत्न यामुळे या महिला रुग्णाला मोठा आधार मिळाला आणि तब्बल चाळीस दिवसांच्या संघर्षानंतर या महिलेला आज शुक्रवारी सायंकाळी जिल्हा सरकारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी सदर महिलेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिकांनी फुलांची उधळण करत निरोप दिला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांकडून देण्यात आलेल्या भावपूर्ण निरोपामुळे सुट्टी मिळालेली महिला चांगलीच गहिवरून गेली होती. यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. याशिवाय भोकरदन तालुक्यातील पारध येथील तरुणीलाही आज सुट्टी देण्यात आली असून आतापर्यंत एकूण सात रुग्णांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात राज्य राखीव दलाचे तीन जवान,परतूर येथील एक,परतूर तालुक्यातील सातोना जवळील एक,इंडेवाडी एक,घनसावंगी तालुक्यातील कानडगाव येथील दोन, रामनगर कारखाना येथील एक आणि जिल्हा रुग्णालयातील एक महिला डॉक्टर, व एका परिचरिकेचा समावेश असून यासर्व रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर चौदा दिवसांनी या रुग्णांचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे श्री राठोड यांनी सांगितले.
Leave a comment