पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
सध्या कोरोनाने देशभर थैमान घातले असतानाच आता पाणीटंचाईचे चटके देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी भरपूर पाऊस झाला. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई परिसरातील धामणगाव येथील जुई धरण आणि शेलुद येथील धामणा धरण तुडुंब भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र भरपूर पाणी असूनही वीज महामंडळाच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसण्याची वेळ आल्यामुळे व लॉकडाऊनमुळे कुठे भटकावे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. यामुळेच येथील महिलांनी हंडा मोर्चाचा काढण्याचा पवित्रा घेतला. पिंपळगाव रेणुकाई येथे दोन कोटी रुपये खर्च करून दानापूर येथील जुई धरणातून पाणीपुरवठ्याची योजना आणण्यात आली. जुई धरणात सध्या दोन महिने पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र महावितरणच्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांना पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी असूनसुद्धा ग्रामस्थांच्या घशाला कोरड सोसावी लागत आहे. पिंपळगाव रेणुकाई गावाची लोकसंख्या जवळपास 11 हजारापेक्षा जास्त आहे.
लोकसंख्येच्या मानाने येथे तीन मोठे जलकुंभ देखील आहे. त्याद्वारेच ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळते. परंतु गेल्या महिनाभरापासून दानापूर येथील जुई धरणातील पाणीपुरवठ्याच्या विहिरींना महावितरणकडून केवळ आठ तासच वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही पिंपळगाव रेणुकाई येथील जलकुंभापर्यंत पाणी येण्यासाठीच एक तास जातो. त्यामुळे जलकुंभ भरत नाही. आणि त्यासाठी कमीत-कमी पाच दिवस लागत असल्यामुळे पिंपळगाव रेणुकाईला पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या रमजानचा महिना असल्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांना बाहेरुन पाणी आनणे शक्य नाही त्यामुळे त्यांना पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोज व्यक्त करावा लागला. एकीकडे कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहे. त्यामुळे पैशाची चणचण भासत आहे तर दुसरीकडे पाण्याची चणचण भासत आहे. अशा दुहेरी संकटाचा सामना पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे.
बंद पडलेले योजनेचे पुन्हा काम सुरू
जुई धरणातून लोडशेडींगमुळे पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने शेलूद येथील धामणा धरणातून पाणी आणण्यासाठी काम सुरू केले आहे. जुई धरणातून पाणी व्यवस्था होण्यापूर्वी शेलुद येथील धामणा धरणातूनच पिंपळगाव रेणुकाईला पाणीपुरवठा केला जायचा, मात्र या धरणावरून येणार्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तेथील पाणीपुरवठा अल्पावधीतच बंद पडला. आता त्या पाइपलाइनची दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.
प्रतिक्रिया..रमजानच्या महिन्यात पाण्यासाठी बाहेरही जाता येईना...रमजान महिना असल्यामुळे आम्ही कुठेही पाण्यासाठी भटकंती करू शकत नाही. रमजानच्या उपवासामुळे अंगात त्राण राहत नाही. शिवाय लॉकडाऊन आहेच. त्यामुळे ग्रामपंचायतीने रमजानमधे तरी आम्हाला मुबलक पाणीपुरवठा करावा. अशी आमची मागणी आहे. उबेद पठाण (ग्रामस्थ)
पाणीपुरवठ्यासाठी केवळ आठ तासच वीज पुरवठा.... दानापूर येथील जुई धरणाच्या विहिरीवर केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. त्यामुळे जलकुंभ करत नाही. आम्ही महावितरणला पाणीपुरवठ्यासाठी जास्त वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र महावितरण जास्त काळ वीज देण्यास तयार नाही. आता शेलुद येथून पाणीपुरवठ्याचे काम सुरू असून, लवकरच मुबलक प्रमाणात ग्रामस्थांना पाणी देण्यात येईलसरपंच अर्चनाताई समाधान देशमुख ग्रां संसद कार्यालय पिंपळगाव रेणुकाई.
Leave a comment