जालना । वार्ताहर
मुख्यालयी न थांबण्यासह बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.आर.हरकळ हे कोणत्याही कामात भ्रष्ट नितीचा अवलंब केल्याशिवाय ते काम तडीस नेत नाहीत. परिणामी शेतकर्यांची अनेक कामे खोळंबून राहात आहेत. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकार्याच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी आणि त्यांना सेवेतून निलंबीत करावे, अशी आग्रही मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह वरिष्ठांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भातील निवेदनात श्री. घुगे यांनी म्हटले आहे की, बदनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. व्ही.आर. हरकळ हे आपल्या कर्तव्यात कसुर करत आहेत. सध्या कोरोना सारख्या (कोवीड-19) च्या रोगाने संपूर्ण देश-महाराष्ट या रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून अहोरात्र परिश्रम घेत आहे. परंतु बदनापूरचे गटविकास अधिकारी हे रेड झोन असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून रोज बदनापूरला ये-जा करत आहेत. त्यांचे हेड क्वार्टर बदनापूर असून सुधा मा. जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशाचे ते उल्लंघन करीत आहे. त्यांच्यामुळे बदनापुर पंचायत समितीतील ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी, सरपंच, लोक प्रतिनिधी यांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी यांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. जालना यांनी संबंधित बीडीओ यांना अनेकदा सुचना देऊन सुद्धा संबंधीत बीडीओ त्या सूचनांचे पालन करीत नाही व खुशाल रोज जालना ते औरंगाबाद प्रवास करत आहेत. तसेच त्यांचा पंचायत समितीचा कारभारही रामभरोसे चालु आहे. कोणतेही काम ते वेळेत न करता ङ्गक्त टाळाटाळ करतात. प.स. सदस्य, जि.प. सदस्य व लोक प्रतिनीधींना ते विश्वासात घेत नाही. त्यांनी सांगितलेल्या विकास कामांमध्ये दिरंगाई टाळाटाळ करतात. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक विहिरीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सप्टेंबर महिन्यात प्रशासकीय मान्यता दिलेली असतांना केवळ पैशाच्या देवाण घेवाणीमुळे सदरील विहिरींचे कार्यारंभ आदेश मे महिण्यात देण्यात आले. इतका वेळ का लागला त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच 14 व्या वित्त आयोग अंतर्गत कोरोना संबंधी उपाय योजना सुरू असतांना सरपंच ग्रामसेवक यांना रक्कम काढण्याच्या परवानगीला टाळाटाळ करणे, पैशाची पुर्तता केल्याशिवाय परवानगी न देणे, टाळाटाळ करणे, सरपंच लोक प्रतिनीधींना त्रास देणे त्यांची कामे न ऐकणे... कोरोना सारखी महामारी सुरू असतांना व शासनाच्या सक्त मुख्यालयी राहण्याच्या सुचना असतांना रेड झोन असलेल्या औरंगाबाद येथुन रोज ये-जा करत आहे. ते अतिशय गंभीर असुन बदनापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पं.स. सदस्य, लोक प्रतिनीधी, नागरीक हे कामानिमित्त भेटायला पंचायत समिती येथे येतात. यात कोरोनाची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण असेल. त्याच प्रमाणे बर्याच योजनांचूत्त देयकाव आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय कुठलेही काम होत नाही असे सरपंच, ग्रामसेवकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. उपरोक्त सर्व बाबी लक्षात घेवून तसेच सदरील गटविकास अधिकार्यांची या पूर्वी ज्या ठिकाणी नियुक्ती होती ती वादग्रस्त आणि तक्रारीचीच राहिलेली आहे. त्यामुळे संबंधित गटविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही श्री. घुगे यांनी निवेदनाच्या शेवटी केली असून या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जालना, विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनाही दिल्या आहेत.
Leave a comment