जालना । वार्ताहर
जिल्ह्यातील मजुरांना रोजगार मिळून अर्थचक्र गतीमान होण्याच्यायादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सोशल डिस्टंन्स व आवश्यक ते नियम पाळुन सुरु करावेत असे आवाहन करत उद्योग सुरु करण्यासाठी प्रशासनामार्फत संपुर्ण सहकार्य करण्यात येत असुन विनाकारण कोणावरही गुन्हा नोंद होणार नसल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.
कोरोना विषाणुच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. या संदर्भात लॉकडाऊनचे पालन करत जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार्या आस्थापना, दुकाने, तसेच इतर बाबींना मर्यादेच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यादृष्टीकोनातुन ग्रामीण व शहरी भागातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करण्यास यापूर्वीच परवानगी दिली असुन कारखानदारांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन कारखाने सुरु करावेत. मजुरांना कोरोना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने कारखान्यांमध्ये मजुरांसाठी मास्क, साबण, सॅनिटायजर आदी साहित्य उपलब्ध करुन द्यावे. मजुरांची वेळा्वेळी डॉक्टरांमार्फत तपासनी करून घ्यावी. मजुरांचे समुपदेशन करावे. विषाणूबाधा अधिक प्रमाणात झाल्यास नाईलाजास्तव काम बंद करावे लागेल. मजुरांच्या हाताला काम देऊन अर्थचक्र अधिक गतीमान करण्यासाठी कारखाने सुरु करण्याचे आवाहन करत यामध्ये काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
Leave a comment