जालना । वार्ताहर
जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये यांची कारवाई स्वस्त धान्य दुकान वेळेवर न उघडणे, शिधापत्रिका धारकांना प्रमाणापेक्षा कमी धान्य देणे, नियमित धान्य वाटप न करणे, शिवाय वाढीव दराने धान्य वाटप करणे आदी कारणांमुळे जालना शहरातील गणपती गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानदार के.पी.जैस्वाल यांच्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एम.बसैय्ये यांनी निलंबित केले आहे.
यासंदर्भात शिधापत्रिकाधारक हर्षल बाबुलाल आवटे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 56 संदर्भात तक्रार केली होती.या तक्रारीत स्वस्त धान्य दुकानदार के.पी.जैस्वाल हे शिधापत्रिकाधारकांना देय नियतनापेक्षा कमी नियतन देत असल्याची बाब नमूद केली होती.सदरील तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी बसेय्ये यांनी जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना जैस्वाल यांच्या दुकानांची तपासणी करून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांनी 17एप्रिल 2020रोजी स्वस्त धान्य दुकान क्रमांक 56वर जावून चौकशी केली केली.चौकशीअंती स्वस्त धान्य दुकानदार जैस्वाल यांनी शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य वितरित केल्याचे निदर्शनास आले.या चौकशीत 10 शिधापत्रिकाधारकांचे जबाब नोंदविण्यात आले.हा चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये यांना सादर केल्यानंतर त्यांनी स्वस्त धान्य दुकानदार जैस्वाल यांच्याकडून खुलासा मागितला.मात्र सदर खुलासा असमाधानकारक असल्याने शेवटी जिल्हा पुरवठा अधिकारी बसैय्ये यांनी 7 मे 2020 रोजी एका आदेशान्वये स्वस्त धान्य दुकान वेळेवर न उघडणे, धान्याची पावती न देणे, ऑनलाईन नोंद असलेल्या शिधापत्रिकांधारकांना प्रमाणापेक्षा कमी धान्य देणे, एप्रिल महिन्याचे धान्य काही शिधापत्रिकाधारकांना वितरित न करणे, वाढीव दराने धान्य वितरित करणे आदी कारणांमुळे जैस्वाल यांच्या दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित केले आहे.
Leave a comment