जालना । वार्ताहर
लॉकडाऊनमुळे जालना जिल्हयातील वेगवेगळया तालुक्यात असलेल्या उत्तरप्रदेशातील 1200 नागरिकांना घेऊन जालना स्टेशन ते उन्नाव (उत्तर प्रदेश) विशेष श्रमिक रेल्वे आज दि. 10 मे 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजता रवाना झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ.कैलास गोरंटयाल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी जालना केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के राठोड, तहसिलदार जालना श्रीकांत भुजबळ, तहसिलदार प्रशांत पडघन, मनोज देशमुख प्रकल्प संचालक राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, नितिन नार्वेकर मुख्याधिकारी न.प. जालना यांच्यासह रेल्वे तसेच आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या विशेष श्रमिक रेल्वेसाठी जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय उत्तर प्रदेशातील कामगारांची माहिती प्राप्त करुन उत्तर प्रदेश सरकारची लेखी परवानगी प्राप्त झाल्यानंतर या कामगारांना तहसिल कार्यालयामार्फत प्रवासाची पास वितरीत करण्यात येऊन कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली उत्तर प्रदेशातील या व्यक्तींना पाठवितेवेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी यांनी 10 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जालना शहराच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू केली होती यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना जालना येथे आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन जालना येथील आय.टी. आय. येथे आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या या रेल्वेचे पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होत. तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले. जालना जिल्हयातील पत्रकारांनी कोणत्याही अफवा पसरु न देता योग्य ती माहिती नागरीकांना दिल्यामुळे त्यांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल जिल्हा प्रशासनाकडुन सर्व पत्रकारांचे आभार मानन्यात आले. राज्य शासनाच्या वतीने. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून जालना जिल्ह्यातून रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने उत्तर प्रदेशात सोडण्यात आलेली ही पहिलीच रेल्वे आहे.
Leave a comment