भोकरदन । वार्ताहर
ऐन परीक्षेच्या कालावधीत कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करावा म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यात आला. परंतु, मे महिना सुरू झाला तरी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. तसेच प्रत्येक दिवशी एकाचवेळी 5 ते 6 लिंक देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त अभ्यासाचा ताण येऊ लागला आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना साधारण 10 ते 15 एप्रिल दरम्यान उन्हाळी सुटी लागते.
परंतु सध्या रोज या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मारा सुरू आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे जिल्हा परिषद पुणे, तंत्रस्नेही शिक्षक समूह, वर्गशिक्षक लिंक टेस्ट बनवून पाठवत आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहुन येणार्या लिंक तसेच काही शैक्षणिक संस्था आपल्या शाळांना स्वत:चा वेगळा अभ्यास देत आहेत. तर काही शिक्षक व मुख्याध्यापक वरिष्ठांना आपला ’’परफॉर्मन्स’’ दाखवण्यासाठी स्वत:च नावानिशी लिंक टेस्ट बनवून पाठवत आहेत. या टेस्ट लिंक ग्रुपवर पडल्या की त्यामध्ये काही बदल करून इतर शिक्षक आपल्या ग्रुपवर कॉपी पेस्ट करीत आहेत. आपले काम दडवण्याच्या नादात विद्यार्थ्यांवर येणारा ताण दुर्लक्षित होत आहे. याबाबत काही शिक्षकांनी आदेश असल्याने आमचा नाईलाज असल्याचे सांगितले .
विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी मिळणार कधी
संचारबंदीला महिना होऊन गेला. विदयार्थ्यांच्या वह्या संपल्या,लेखन साहित्य संपले. मग हा अभ्यास कसा पूर्ण करायचा. वारंवार अशा लिंक येत असल्याने विद्यार्थी बेजार झाले आहेत. काही शाळा त्याच इयत्तेचा तर काही पुढील इयत्तेचा अभ्यास देतात यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. तर दिवसातील चार तास मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात राहत असल्याने. मुलांना मोबाईलचे व्यसन जडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार अभ्यास यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य ढासळले आहे. पण याचा विचार न करता भरमसाठ अभ्यास धाडणे सुरू आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रमात नियोजनाचा अभाव
याबाबत जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधता आला नाही , राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून या लिंक येत आहेत.असे समजते, आणखी किती दिवस या लिंक येतील याबाबत त्यांनाच विचारावे लागेल. जिल्हा परिषदेकडून लिंक पाठवणे आता बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र जिल्हा परिषद शिक्षक व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून अशा लिंक येत असल्याचे पालकांनी सांगितले. यामुळे जिल्हा शिक्षण विभागाचा नियोजनाचा अभाव समोर येत असून स्वत: जिल्हा शिक्षण अधिकारी देखील या ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
Leave a comment