राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजने केली 40 दिवस अन्न व निवास व्यवस्था; परिस्थिती पुर्ववत होताच परत येण्याचे कामगारांचे आश्वासन
जालना । वार्ताहर
टाळेबंदीनंतर बंद झालेल्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमुळे अनेकांना इच्छा असूनही वेळेत स्वगृही परत जाता आले नाही. त्यातच हाताला काम नसल्याने हताश झालेल्या येथील राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजच्या तब्बल 91 कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने दिलासा दिला असुन दोन महिन्याचे वेतन देऊन त्यांची ओडीशातील मुळ गावी जाण्यासाठी रवानगी केली आहे. त्यांच्या प्रवासाचा खर्च देखील राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजने उचलला असुन गुरुवारी (ता.7) सकाळीच तीन खासगी बसने हे कामगार ओडीशाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, इंडस प्रकल्प समन्वयक मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, राजुरी समुहाचे कैलास लोया, शिवरतन मुंदडा, पुरुषोत्तम तोष्णीवाल, संतोष मुंदडा, कर्मचारी संदिप खरात, सचिन कोल्हे, मुरलीधर काकड, देविदास भुतेकर, सखाराम चौंडे, हनुमान कामड, राहुल दवे,गोविंद पवार, मारोती घोडे, प्रभाकर वाघ आदींची उपस्थिती होती.
जालना औद्योगिक वसाहत परिसरातील राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजमध्ये स्थानिक कामगारांसह काही परप्रांतीय कामगार देखील काम करतात. यामध्ये ओडीशा राज्यातील कटक व जाजपुर या दोन जिल्ह्यातून तब्बल 91 कामगार कंपनीत कामासाठी आले होते. परंतु कोरोना महामारीच्या प्रतिंबधात्मक उपायांचा भाग म्हणुन दिनांक 23 मार्चपासून भारतात टाळेबंदी सुरु झाली व इतर कामगारांप्रमाणे या कामगारांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. परंतु राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या कामगारांच्या निवास तसेच भोजनाची व्यवस्था केली. तब्बल 40 दिवस कंपनीत काढल्यानंतर लॉकडाऊन वाढण्याची भिती व्यक्त करीत या कामगारांनी ओडीशात स्वगृही जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीजने जालना तहसिल कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेऊन व सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करुन तीन खासगी बसद्वारे त्यांना ओडीशाला पाठवण्यात आले आहे. राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीज व्यवस्थापनाने समुपदेशन केल्यानंतरही कामगाराच्या कुटुंबीयांकडून कामगार कंत्राटदारावर वारंवार कामगारांना स्वगृही पाठवण्यासाठी दबाव येत असल्याने व कामगारांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजुरी स्टील वसप्तश्रुंगी इंडस्ट्रीजने कामगारांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना कामगारांनी राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीज व्यवस्थापन व मालकांनी लॉकडाऊन काळात काळजी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. कामगारांसोबत भोजन, सॅनिटायजर व मास्क देखील पाठवले आहेत. ही आमची जबाबदारी आमच्याकडे काम करणार्या प्रत्येक कामगाराची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असल्याने आम्ही या कामगारांच्या ईच्छेनुसार त्यांना घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली. आमच्या कामगारांनी परिस्थिती पुर्ववत येताच पुन्हा कामावर हजर होण्याचे आश्वासन दिले आहे. कैलास लोया, संचालक, राजुरी स्टील व सप्तश्रुंगी इंडस्ट्रीज.प्रवासात काळजी घ्या दरम्यान, तीन विविध बसमध्ये ओडीशा प्रवासासाठी रवाना झालेल्या कामगारांना प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिल्या...दरम्यान, जालना औद्योगिक वसाहतीतील सर्वच कंपन्यांनी सर्व कामगारांना लॉकडाऊन काळातील पगार दिला. परप्रांतीय कामगारांच्या भोजन व राहण्याची व्यवस्था देखील केली. सर्व परप्रांतीय कामगारांना लॉकडाऊन उघडताच त्यांच्या घरी सुखरुप सोडण्याची हमी कंपनी संचालकांनी दिली होती. परंतु कामगारांच्या घरुन सारखे ङ्गोन येत असल्याने व काही कामगार स्वत:हून घरी गेले असल्याने आता कंपन्यांनीच कामगारांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु प्रशासकिय परवानगीने आता कंपन्या सुरु होत असल्याने काही कामगारांनी येथेच थांबुन काम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनी संचालकांनी सांगीतले. ..कामगारांच्या कुटूंबीयांचा दबाव कंपनीत अडकलेल्या कामगारांना ओडीशात परत आणुन घालण्यासाठी ओडीशातील काही सरपंच व कामगारांचे नातेवाईक सारखा दबाव आणत होते. मी ही माहिती कैलास लोया यांना दिल्यानंतर त्यांनी कामगारांना सुरक्षित घरी पाठवण्याची व्यवस्था करुन दिली. -बबलु, लेबर कॉन्ट्रॅक्टर.
Leave a comment