व्हिडिओकॉलद्वारे मातेने पाहिले बाळास
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 रुग्ण आज वाढले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 321 झाली. भडकल गेट, टाऊन हॉल येथील 58 वर्षीय कोविड रूग्णाचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांच्या मृत्यूस कोविड आजार कारणीभूत ठरला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) रुग्णालयात बायजीपुर्यातील 28 वर्षीय कोविडग्रस्त मातेच्या चिमुकलीचा अहवाल निगेटीव्ह आला. तिथे बाळाची काळजी डॉक्टर घेताहेत.
मिनी घाटीत 121 कोविड रुग्ण-औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 321 झाले आहेत. आज वाढ झालेल्या रुग्णांमधील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (21), अजब नगर (1), संजय नगर (1), बौद्ध नगर (1) या परिसरातील आहेत. यामध्ये 14 पुरूष आणि दहा महिला रुग्ण आहेत. आज मिनी घाटीमध्ये 123 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळेस पाठविण्यात आले. सध्या मिनी घाटीमध्ये 121 कोविड रुग्ण उपचार घेताहेत, असे मिनी घाटी प्रशासनाने कळवले.
घाटीत कोविड मातेच्या बाळाची डॉक्टर घेताहेत काळजी-इंदिरानगर बायजीपुर्यातील 28 वर्षीय महिलेची नैसर्गिक प्रसूती शनिवारी (दि.2 मे) दुपारी 12 वाजता झाली. मातेचा रिपोर्ट कोविड पॉझिटीव्ह आल्याने लगेच चिमुकलीस डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल वॉर्डातील एनआयसीयूमध्ये दाखल केले होते. या चिमुकलीचा रिपोर्ट आज निगेटिव्ह आला. या चिमुकलीची संपूर्ण काळजी कर्तव्यावरील परिचारिका व डॉक्टर्स घेताहेत. डॉ.एल.एस.देशमुख व इतर नवजात शिशु विभागातील अध्यापक, कर्मचारी बाळाची देखभाल तत्परतेने करताहेत. आता चिमुकलीच्या आजीची कोविड चाचणी करण्यात येत आहे. त्या प्राप्त होणार्या अहवालावरून चिमुकलीबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे. चिमुकलीचे आजोबा व इतर नातेवाईकांशी घाटी प्रशासनाकडून टेलीकॉउंसेलिंग (फोनद्वारे समुपदेशन) करण्यात येते आहे.
प्रसूती झालेल्या मातेचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने माता व बाळाची झालेली ताटातूट दूर करण्यासाठी व्हिडिओकॉलद्वारे बाळास डोळेभरून मातेने पाहिले आहे, यासाठी घाटी प्रशासनाने पुढाकार घेतल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. तसेच त्याही या चिमुकलीची सुश्रुषा समाधानकारक होत असल्याची खात्री करून घेत आहेत, असेही त्या म्हणाल्या. घाटी रुग्णालयात दुपारी चार वाजेपर्यंत 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. दोन रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. 18 रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. किलेअर्क येथील मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून कैलास नगरातील 20 वर्षीय पुरूष, मिनी घाटीतून हिंगोलीच्या एसआपीएफ कॅम्प येथील 35 वर्षीय पुरूष रुग्ण घाटीत संदर्भीत केल्याने घाटीच्या डेडिकेटेड कोविड रूग्णालयात 21 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 19 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. घाटीत 38 कोविड निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 12 कोविड निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिल्याचेही डॉ. येळीकर व माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.
खासगी रुग्णालयात एकाचा मृत्यू- तर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भडकल गेट, टाऊन हॉल येथील 58 वर्षीय कोविड रूग्णाचा आज उपचारादरम्यान सकाळी 8.30 वाजता मृत्यू झाला. त्यांना 27 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिआ आणि कोविड असल्याचे रुग्णालयाच्यावतीने कळविले आहे.
Leave a comment