केवळ 3 डॉक्टर कर्तव्यावर; 4 डॉक्टर बेपत्ता, रूग्णांची गैरसोय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष देण्याची मागणी
जालना । वार्ताहर
अंबड-घनसावंगी मतदार संघातील महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अंबड उपजिल्हा रूग्णालय राम भरोसे चालत असून, कर्तव्यावरील 7 पैकी तब्बल 4 वैद्यकीय अधिकारीच गायब असल्याने रूग्णसेवेचे तीनतेरा झाले आहे. एव्हढ्या मोठ्या अंबड उपजिल्हा रूग्णालयात केवळ 3 डॉक्टर व नर्सच्या भरोश्यावरच रूग्णसेवा होत असल्याने रूग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोनामुळे नागरिक भयभीत आहे. महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सतर्कतेमुळे व उपाययोजनेमुळे कोरोनाला झुंजल्या जात आहे. मात्र अपवाद अंबड उपजिल्हा रूग्णालय आहे. येथील 4 डॉक्टर विविध कारणाने रूग्णालयता येत नाही. याची खातरमाहिती राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मिळाली की, नाही? असा प्रश्न आहे.
अंबड येथील उपजिल्हा रूग्णालयात एकूण 7 वैद्यकीय अधिकार्यांच्या जागा भरलेल्या आहे. त्यामध्ये डॉ. गाडेकर व डॉ. गंगवाल हे प्रतिनियुक्तीवर जालना जिल्हा रूग्णालयात आहेत. डॉ. अलिया खान या 2 महिन्याच्या रजेवर आहेत. त्यांची रजा संपून एक महिन्याचा कालावधी झाला मात्र अद्यापही त्या अंबड येथे रूजू झाल्या नाहीत. बेकायदेशीर अजूनही त्या गैरहजर आहेत. डॉ. किरण कदम हे औरंगाबाद येथून ये-जा करीत आहे. त्यांना कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जालना-औरंगाबाद रोडवर चेकपोस्टवर थांबविण्यात येत आहे. त्यामुळे तेही अंबड उपजिल्हा रूग्णालयात गैरहजर आहे. असे एकूण 4 वैद्यकीय अधिकारी अंबड उपजिल्हा रूग्णालयाच्या बोर्डावर असून, प्रत्यक्षात नाही. तर सद्या अंबड उपजिल्हा रूग्णालयात डॉ. भिमराव दोडके, डॉ. अश्विनी(गोद्दे) मिसाळ, डॉ. इरङ्गान शेख असे 3 डॉक्टर कार्यरत असून, रूग्णसेवा बजावत आहे. सद्या अंबड उपजिल्हा रूग्णालयात सर्दी, खोकला व इतर आजाराचे रूग्ण दररोज येत आहे. मात्र, त्यांच्यावर केवळ 3 डॉक्टरच उपचार करीत असल्याने रूग्णांची गैरसोय होत असून, या तिन्ही डॉक्टरांना रूग्णांची तपासणी व कोरोना संदर्भातील उपाययोजना करीता-करीता नाकीनऊ येत आहेत. कोरोना विषाणुच्या संकट काळात महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ आदेश देऊन वरिल प्रतिनियुक्तीवर गेलेले 2 डॉक्टर, बेकायदेशीर गैरहजर महिला डॉक्टर, लॉकडाऊनमध्ये औरंगाबादला अडकलेल्या डॉक्टरला अंबड उपजिल्हा रूग्णालयात रूजू करावे , जेणे करून रूग्णांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांतून होत आहे.
Leave a comment