जालना । वार्ताहर
शहरातील मंठा चौङ्गुलीजवल असलेल्या साईनाथ नगर आणि भोकरदन तालुक्यातील पारध मधील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. पारध येथील मूळ रहिवासी असलेली मात्र कामानिमित्त गुजरात राज्यातील सुरत येथे वास्तव्यास असलेली एक 17 वर्षीय मुलगी आपल्या अन्य नातेवाईकांसह नुकतीच पारध येथे पोहचली होती.लॉकडाऊन असतांना सुरत येथुन प्रवास करत आलेल्या या सर्वांना पारधमध्ये प्रवेश देण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केल्यानंतर सुरत येथून परतलेल्या आठ ते नऊ जणांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यात एका 17 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह आरोग्य पथकाला तातडीने पारध येथे पाठवून सदर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणीच्या संपर्कात आलेल्या 20 संशयीत व्यक्तींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याशिवाय जालना शहरातील साईनाथ नगर मधील रहिवाशी असलेला एक 34 वर्षीय तरुण औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून नोकरीला असून औरंगाबाद येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने भितीपोटी त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना दि.30 एप्रिल रोजी जालना येथील साईनाथ नगर मधील निवासस्थानी आणून सोडले व तो पुन्हा औरंगाबाद येथे परतला होता.तेथे पोहचल्यानंतर त्याची घाटी रुग्णालयात तपासणी करून त्याच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर सदर वॉर्डबॉय कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून साईनाथ नगर सील करून सदर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणांच्या नातेवाईकांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकून आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्वांचे अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासन,आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा वासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Leave a comment