औरंगाबाद । वार्ताहर
चोरलेला भंगार माल खरेदी केल्याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी 70 हजारांची लाच घेणारा पोलीस नाईक व त्याला मदत करणारा भंगार विक्रेता यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक केली. दिलीप कारभारी तेजीमकर (48, रा. पदमपुरा) असे पोलीस नाईकाचे नाव असून तो दौलताबाद पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. शेख फारूख शेख युनूस (32, रा. दौलताबाद) असे दुसर्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी दौलताबादच्या एका भंगार विक्रेत्याकडून काही भंगार खरेदी केले होते. तेजीमकरला याची माहिती मिळताच त्याने फारूखच्या माध्यमातून तक्रारदाराला तू चोरीचा भंगार माल खरेदी केला, असे म्हणून धमकावले. हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगून गुन्हा दाखल करायचा नसेल तर 70 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी तेजीमकरने केली. त्याच्या धमक्यांना व त्रासाला कंटाळून तक्रारदाराने तेजीमकर हा लाच मागत असल्याची तक्रार एसीबीकडे केली. तक्रारीची शहानिशा केली असता तेजीमकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून फारूखने पैसे घेताच पथकाने त्याला पकडले. त्यानंतर तेजीमकरला ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या खिशात 50 हजार रुपये आढळले. पथकाने या दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, गणेश पंडुरे, विजय बाम्हंदे, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी ही कारवाई केली.
Leave a comment