औरंगाबाद । वार्ताहर
महापालिका पथकाकडून शहरातील व्यापारी आणि नागरिक यांना तपासणीच्या नावाखाली त्रास दिला जात असून जर हा त्रास कमी झाला नाहीतर मनसे आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य विधानसभेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. शहरात मागील काही दिवसांपासून थर्मामीटर आणि ऑक्सीमीटर तपासणी नावाखाली मनपा पथकाकडून लहानात लहान व्यापार्यांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. तसेच गुन्हा नोंद करण्याची धमकीही देण्यात येत असल्याचे समोर आले.
थर्मामीटर आणि ऑक्सीमीटर खरेदी साठी व्यापार्यांना वेगळा खर्च ही लागत आहे. मनपा कडून काही मदत न मिळाल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनला मनसे कडून काही सूचना देण्यात आल्या. यामध्ये व्यापार्यांना विनाकारण त्रास देऊ नये, शहरात जनजागृती आणि आरोग्य शिबीर आयोजित करावे, यात मनसे कार्यकर्ते मदत करतील, रोजगार ठप्प झालेले नागरिक आणि व्यापारी यांना मालमत्ता कर , नळपट्टी, यामध्ये सवलत द्यावी. मनपा अधिकारी आणि कर्मचार्यांकडून कोणावरही दडपण येईल, कोणालाही त्रास होईल असे कार्य करून आधीच कोरोनाची भीती असताना त्यात मनपा ने भर घालू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे मनसे कडून औरंगाबाद महानगरपालिका उपायुक्तांकडे निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष कुटे, दिपक पवार, गणेश साळुंके, अविनाश पोफळे, चंदू नवपुते, राहुल कुबेर, युवराज गवई, बाबुराव जाधव, रामकृष्ण मोरे, शशिकांत पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment