स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा

औरंगाबाद । वार्ताहर

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध कामांचा व महानगर पालिके अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास 40 ते 50 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबतचे त्वरीत सर्वेक्षण करुन पंचनामे करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यात मुख्यमंत्री यांची संकल्पना असलेले विकेल ते पिकेल या धर्तीवर  कृषी  मालावर आधारित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा समावेश करावा. रेशीम, कापूस, मका इत्यादी पिकांवर प्रक्रिया करुन उत्पादनाचा समावेश केल्यास रोजगार निर्मिती होऊन युवा शेतकर्‍यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल.

तसेच जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल, तालुका पातळीवरील संकुलाची कामे आणि क्रीडा संदर्भातील प्रगतीपथावरील विविध कामे आणि पुढील नियोजनासंबंधीचे प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना श्री.देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च 2021 या कालावधीत होणार्‍या फिफा वर्ल्ड कप मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसंबंधी नियोजनाची सविस्तर माहिती दिली. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले म्हणाले की, सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर जिल्ह्यातील पठारे विकसीत करण्यात येणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच फुलांच्या विविध जातींचे रोपे विकसित करण्याकरिता त्यांची बिजे गोळा करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची यावेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्ज योजनेअंतर्गत 1 लाख 78 हजार 630 लाभार्थ्यांच्या खात्यात 936 कोटी 61 लाख रुपये जमा झाले असल्याची माहिती दिली. पीक विमा, फळपीक विमा, पणन विभाग, अन्न पुरवठा, कोरोना काळातील शिवभोजनाचा लाभ, बिगर शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आलेला शिधा, इत्यादी विविध विषयासंबधी सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी यावेळी घेतला.  प्रारंभी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामाजिक सौहार्द राखण्याच्या अनुषंगाने पुढील एक महिना सामाजिक सलोखा आणि सुरक्षा अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून या अभियानाची रुपरेषेच्या आखणी पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.