औरंगाबाद । वार्ताहर
शहरातील जुना मोंढा ते जाफर गेट बाजारपेठेत जाण्यासाठी असलेला रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने व्यापार्यांना ट्रान्सपोर्ट साठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी व्यापारी वर्गाच्या वतीने आज जाफर गेट येथे खड्ड्यांना श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन करीत मनपाचा निषेध केला. गेल्या अनेक वर्षांपासून जुना मोंढा, जाफर गेट ते राजाबाजार दरम्यान असलेल्या दुकानांमध्ये शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहक खरेदीसाठी येतात. तसेच सर्वाधीक व्यापार्यांना ट्रान्सपोर्टसाठी वाहतूक याच रस्त्यावर केली जाते.
परंतु या रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने व्यापार्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. त्यातच अनेक व्यापार्यांना मणक्याचे आजार, पाठ दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. तसेच पाऊस पडल्याने देखील या रस्त्यावर पाणी साठून अनेकजण या रस्त्यावरून पडून जखमी होतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हा व्यापारी महासंघ, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, किराणा असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Leave a comment