औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद :शहरातील सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळील स्पेअरपार्ट विक्रीच्या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागून दुकानातील सुमारे 12 लाखाचे साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख हैदर मिया (रा.पिसादेवी रोड,औरंगाबाद) यांची सिडकोतील बळीराम पाटील शाळेच्या जवळ मुस्कान ऑटो पार्टस नावाने ऑइल, वाहनांच्या बॅटरी, व ऑटो पार्टस विक्रीचे दुकान आहे. रात्री नित्याप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून घरी गेले. मात्र रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मित्र घरी आला व दुकान जळत असल्याची माहिती हैदर यांना दिली.
त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली व पोलिसांसह अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच सिडको पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले व तासभर अथक परिश्रम घेत ती आग आटोक्यात आणली, मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. आगीने सर्व दुकानाला विळख्यात घेत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. आग ही बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी या आगीत दुकानातील सुमारे 12 लाखाचा नुकसान झाले आहे, या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Leave a comment