सिल्लोड । वार्ताहर
आरोग्य विभागाच्या असमन्वयामुळे उदघाटन होवून देखील शिवना येथील कोविड सेंटर कार्यान्वित झाले नसल्याचे समजतात महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य विभागाची कानउघाडणी करताच शिवना येथील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ना. अब्दुल सत्तार यांच्या निर्देशानुसार शिवना येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना योग्य उपचार मिळतो आहे का ? तसेच येथील येणार्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी आज (दि.16) रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बनसोडे यांनी शिवना येथे भेट देऊन कोविड सेंटर मधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व तेथील आरोग्य सुविधेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश राठोड व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान गेल्या महिन्यात ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवना येथील कोविड सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले होते. त्यानंतर ना.अब्दुल सत्तार यांना मुंबई येथे कोरोनाची लागण झाल्याने ते मुंबई येथे उपचार घेत होते. या दरम्यान आरोग्य विभागाच्या असमन्वयामुळे शिवना येथील कोविड सेंटर कार्यान्वित झाले नसल्याचे समजताच ना. अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर घेत त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर लगेच शिवना येथील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. शिवना येथील कोविड सेंटर येथे 50 बेडची व्यवस्था असून यासाठी एकूण 5 डॉक्टर व त्यांच्या मदतीला आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. आज येथे 33 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून शिवना सह पानवदोड , धोत्रा इत्यादी भागातील रुग्णांना उपचाराचा लाभ मिळत आहेत.
Leave a comment