औरंगाबाद । वार्ताहर
कर्जबाजारी झालेल्या एका तरुणाने चक्क ओळखीच्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलावर रिव्हलवर लावून पैशे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांनी प्रसंगावधानता राखत त्याच्या हातातील रिव्हलवर हिसकावून त्यास पकडले. ही खळबळजनक घटना आज सकाळी दिवसाढवळ्या हर्सूल जवळील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर तरुणासह गावठी रिव्हलवर ताब्यात घेतली आहे. राहुल रावसाहेब आधाने (वय-29 रा.रांजणगाव, वाळूज) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय गाडे (रा.हरसिद्धी हाऊसिंग सोसायटी,हर्सूल) हे वाळूज औधोगिक परिसरात एका कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. राहुलला गाडे परिवारातिल सदस्यांची संपूर्ण माहिती होती. गाडे परिवार धनाढ्य असल्याचे त्याला ठाऊक होते. आरोपी राहुल हा रांजणगाव येथील दूध डेअरीवर कामाला आहे. त्याच्यावर अनेकांची उधारी आहे. पैशासाठी अनेक जण त्याकडे तगादा लावत होते. पैसे मिळविण्यासाठी त्याने चक्क ओळखीच्याच गाडे परिवाराला लुटण्याचा प्रयत्न केला. राहुल सकाळी शहरातील हर्सूल भागात आला. त्याने गाडे यांचे दार ठोठावले असता गाडे यांच्या लहान मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळी मला गणेश दीक्षित यांनी पाठविले असे सांगून त्याने घरात प्रवेश केला. व काही मिनिटातच त्याने गाडे यांच्या मुलावर गावठी रिव्हलवर रोखली. दरम्यान तेथे गाडे यांच्या पत्नी आल्या त्यांनी आम्ही पैशे देतो, अशी थाप मारत वरील खोलीत घेऊन गेल्या. तो पर्यंत बाजूच्या खोलीत झोपलेले गाडे व त्यांचा लहान मुलगा दोघेही वरील खोली मध्ये आले. व एकाच वेळी चौघांनी आरोपी राहुल वर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्याच्या हातातील रिव्हलवर खाली पडली. घरातील सदस्यांचा रुद्रावतार पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र बाहेर बसलेल्या तरुणांनी त्याला पळताना पकडले. ही माहिती पोलिसांना मिळताच तातडीने हर्सूल पोलिसांनी राहुलला ताब्यात घेत त्याच्या जवळील रिव्हलवर जप्त केली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Leave a comment